"स्पृश्य' हिंदूप्रमाणेच "अस्पृश्य' हिंदूंनीही त्यांच्या पापाचे स्वयंस्फूर्तीने प्रायरश्र्चित घेतले!

    वरील उपमथळा वाचून पुष्कळांना आपातत: असा अचंबा वाटेल की, हे काय! इतर लादली हे स्पृश्यांचे पाप होय, परंजु ज्यांच्यावर ती दुष्ट हीनता लादली गेली त्या बिचार्‍या अस्पृश्यांनी ह्या प्रकरणी कोणते पाप केले? ' ते पाप हे होय की, चातुर्वर्णीय स्पृश्य हे ज्या जातींना अस्पृश्य मानीत आले त्या अस्पृश्यतांतील कित्येक जातीही स्वत:स उच्च समजून त्यांच्या खालच्या समजल्या गेलेल्या जातींना अस्पृश्य मानीत आल्या आहेत! महार, चांभार, मांग, ढोर, भंगी हे आपापल्या देवळात त्यांच्या "खालच्या' समजल्या गेलेल्या अस्पृश्य जातींना येऊ देत नाहीत. आपसात जेवत नाहीत, शाळेत महारांची मुले भंग्याच्या मुलांसह सरमिसळ बसत नसत. त्यांचा त्यांना विटाळ होई! अशी कित्येक प्रकरणे आम्ही स्वत: सोडविली आहेत. काश्मीरपासून त्रावणकोरपर्यंत जात्युच्छेदनासाठी आमच्या झालेल्या दौर्‍यातून, हिंदूस्थानच्या सर्व प्रांतातून, अस्पृश्या-अस्पृश्यांतही अस्पृश्यता पाळावी जाते हा आमचा स्वत:चा अनुभवी आहे. चातुर्वर्णीय स्पृश्य चेरुमांना अस्पृश्य समजतात. पण त्या अन्यायासाठी स्पृश्यांना लाखोली वाहणारे चेरुमा अस्पृश्य स्वत: तोच अन्याय पुलादी, परिया प्रभृति खालच्या जातीवर लादून त्यांना अस्पृश्य मानतात! जी जी निंदा कोणी अस्पृश्य अस्पृश्यतेसाठी करतो, त्या त्या निंदेच्या प्राप्तीचा अर्धा वाटा त्या अस्पृश्यांच्याही वाट्यास येतो. कारण तो अस्पृश्य त्याच्या खालच्या जातीवर तीच अस्पृश्यता लादीत असतो! हा सर्वसाधारण प्रकार आहे. दहा बारा वर्षापूर्वी त्रावणकोरच्या क्षत्रिय महाराजांनी त्यांचे सचिवोत्तम रामस्वामी अय्यर ह्या ब्राह्मण प्रधानाच्या पुरस्कारत्वाने आपली सर्व राजमंदिरे तथाकथित अस्पृश्यांना उघडल्याची अभिनंदनीय घोषणा जेव्हा केली, तेव्हा तिकडच्या अस्पृश्यांनीच "उच्च अस्पृश्य' जे एझुया त्यांच्यातील बहुजनांनी ते ज्यांना अस्पृश्य समजतात त्या पालुवा अस्पृश्यांना त्यांच्या मंदिरात प्रवेश करून देण्यास विरोध केला! अस्पृश्यही अस्पृश्यतेच्या पापाचे अशा रीतीने भागीदार आहेत ह्या गोष्टीची जाणीव पुष्कळांना नसते. ही दुष्ट रुढी अस्पृश्यवर्गही आपापसात किती कट्टरपणे पाळीत आला आहे- फार काय, वरवर समतेचा डंका पिटणार्‍या मुस्लिमात नि ख्रिश्र्चनातही अस्पृश्यता नि जातिभेद कसा पाळला जात आहे ही सविस्तर चर्चा ज्यांना वाचावयाची असेल त्यांनी आमचे "जात्युच्छेदक निबंध' नि विशेषत: त्यातील "मद्रास प्रांतातील काही अस्पृश्य जाति', महारबंधूंशी मनमोकळा विचारविनियम, मुसलमानी पंथोपंथांचा परिचय नि "मुसलमानी धर्मातील समतेचा टेंभा' हे निबंध तरी अवश्य वाचावेत.

    परंतु आमच्या भारतीय राज्यघटनेत जेव्हा "अस्पृश्यता नष्ट करण्याची' ही घोषणा करण्याचा बेत ठरत होता. तेव्हा हे उघडच झालेले होते की, केवळ चातुर्वर्णीय स्पृश्यांनाच काय ती अस्पृश्यांवर अस्पृश्यता "गाजविण्याची' बंदी त्या घोषणेमुळे होणारी नव्हती. तर अस्पृश्यांतील तथाकथित उच्च अस्पृश्यांनाही त्यांच्या "खालच्या' अस्पृश्यांना अस्पृश्य मानण्याची बंदी होणारी होती. अस्पृश्य हिंदूंतील उच्च जातीचे जन्मजात उच्च नीचपणाचे पिढीजात अहंकार, हाडीमासी खिळलेले भ्रामक धर्माचार नि तज्जन्य विशिष्ट हितसंबंध हेही त्या घोषणेप्रमाणे नष्ट होणारे होते. परंतु एवढ्यासाठी अस्पृश्य हिंदूंचे त्या त्या जातीचे जे प्रतिनिधी राज्यघटना परिषदेत होते. त्यांनी अस्पृश्यता आमूलात्‌नि सर्वप्रकारे नष्ट करणार्‍या त्या घोषणेस विरोधले होते की काय! आनंदाची नि अभिमानाची गोष्ट ही की तसे काहीही न करता अस्पृश्य हिंदूंच्या प्रतिनिधिंनाही या प्रकरणापुरते आपापल्या जात्यहंकारात नि विशिष्याधिकारांवर स्वेच्छेने पाणी सोडून अस्पृश्य हिंदुसमाजात आपापसात  जी अस्पृश्यता आजवर पाळीत आला त्या पापाचे राष्ट्रकल्याणार्थ प्रायश्र्चि घेतले आणि त्या घोषणेस सर्वतोपरी पाठिंबा दिला. अस्पृश्य हिंदूंच्या अखिल भारतीय संस्थांनीही त्यांच्या प्रतिनिधींच्या या सत्कृत्यास उचलून धरले.

    स्पृश्य काय, अस्पृश्य काय, हिंदुमात्र तेवढा साराच्या सारा या जन्मजात अस्पृश्यतेच्या पापाचा भागीदार होता. दोष न्यूनाधिक प्रमाणात सर्वांच्या हातून घडला. त्या सामाजिक पापाचे सामाजिक परिमार्जन करण्यासाठी आमच्या भारतीयर महाराज्याच्या मूल घटनेत जी नैर्बंधिक प्रतिज्ञा केली की, "आजपासून कोणाही नागरिकावर जन्मजात अस्पृश्य म्हणून कोणतीही हीनता वा अक्षमता लादणे हा निर्बंधानुसार एक दंडनीय अपराध समजला जाईल. ती घोषणा आपल्या अखिल हिंदुराष्ट्रास जितकी हितावह तितकीच भूषणास्पदही ठरणारी आहे.

    ही घोषणा हिंदुराष्ट्रास किती भूषणास्पद आहे हे स्पष्टविणारी आणखी एक गोष्ट उल्लेखनीय आहे. ज्या राज्यघटनेत हा अस्पृश्यता नष्ट करण्याचा निर्बंध गोविला गेला त्या राज्यघटनेत रचनामंडळाचा अध्वर्यू कोण होता? ह्या नव्या स्मृतीचा स्मृतिकार कोण होता? तो अध्वर्यु, तो स्मृतिकार होता. एक "जन्मजात अस्पृश्य'! विद्वानांतील विद्वान, स्मृतिशास्त्रापारंगत, पट्टीचा निर्बंध पंडित डॉ. आंबेडकर! एक महाराष्ट्र कुलभूषण महार! बरे, त्यांनी तरी ते रचना मंडळाचे अध्वर्युपद एखादे अस्पृश्यांचे बंड उभारून नि स्पृश्यांना तरवारीच्या धारेवर धरून बळकावले होते की काय? नव्हे! आमच्या हिंदुराष्ट्रातील जातीपाती प्रांतनिर्विशेष अशा सर्व प्रतिनिधींनी स्वेच्छेने दिलेल्या मतानुसार त्यांना नियुक्त केलेले होते त्या अध्वर्युपदी! पुन्हा, अशा घटना रचना मंडळाच्या अध्वर्युपदी त्या जन्मजात "अस्पृश्याची' नियुक्ती करणार्‍या मतांमध्ये बहुसंख्य अस्पृश्यांचीच होती की काय? नव्हे, ती बहुसंख्य होती स्पृश्यांची!