प्रतिकूल परिस्थितीवर मात करणारा कायापालट करण्याची हिंदुराष्ट्राची क्षमता
वरील एकंदर स्फुट विवरणावरून एक अत्यंत आश्र्वासक निश्र्चिति बाळगता येते की, प्रतिकूल परिस्थितीशी टक्कर देवून टिकण्याची जी क्षमता सृष्टीतील जीवनकलहात जगण्यासाठी अवश्य असते. ती क्षमता हिंदुराष्ट्राच्या अंगात आजही उत्कटपणाने बसत आहे. कधी वेळीच, कधी विलंबाने परंतु नेहमी अतिसमय होण्याच्या आधीच प्रतिकूल परिस्थितीशी टक्कर देवनू तिच्यावर मात करण्यास अवश्य तो कायापालट आपल्या समाजरचनेत नि आचारविचारवंत घडविण्याची उज्जीवक शक्ती हिंदु राष्ट्राने प्राचीन काळापासून वेळोवेळी प्रकटविली आहे. आमच्या अनेक स्मृतीत अमुक आचरण वा रुढी धर्म्य म्हणून वा विहित म्हणून सांगितल्या असतात, तर दुसर्या स्मृतीत अथवा केव्हा केव्हा तर त्याच स्मृतीच्या दुसर्या भागात अधर्म्य नि निषिद्ध म्हणून सांगणारी वचने आढळतात. अशा वचनातील तो विरोध ऐतिहासिक दृष्टीने पाहता बहुधा केवळ विरोधाभासच असतो. नव्यानव्या प्रतिकूल परिस्तितीशी नि संकटांशी यशस्वी झुंज घेता यावी म्हणूनच त्या त्या काळी अहितकारक ते ते जुने आचार निषेधून अथवा हितकारक ते नवे आचार, नवी साधने, नवी ध्येये, नि नवे निर्बंध स्वीकारून नि आज्ञापून, राष्ट्ररक्षण करण्याचे जे सर्व ऐहिक धर्माधर्माचे मुख्य कर्तव्य तेच ह्या भिन्नकालीन स्मृतीतील ह्या वरवर विरोधी दिसणार्या वचनांनी अविरोधपणे शतकानुशतके पार पाडले आहे. कलिवर्ज्य, युगर्हास, आपद्धर्म प्रभृति अनेक स्मार्त संकेत, (लीगल मॅक्झिम्स) उदभवून ह्या आमच्या स्मृतिकारांनी हिंदुराष्ट्राच्या स्वत्वास, एकात्मकत्वास नि वर्धनक्षमतेस धक्का न लावता, समाजरचनेचा कालोचित कायापालट केलेला आहे. नाग जसा वेळ येताच जीर्ण कात टाकून देवून पुन्हा एकदा नव्या तेजाने तळपू लागतो तसेच हे आमचे हिंदुराष्ट्र जीर्णशीर्ण आचारांची नि आजारांची कात वेळोवेळी टाकून देऊन कायाकल्प करून, शंभर संकटांतून शंभरवेळा निभावून जयिष्णु नि वर्धिष्णु तेजाने तळपत आलेले आहे. त्याच्यात अंतर्हित असलेली ही उज्जीवनशक्ती आजही धगधगलेली आहे. जन्मजात अस्पृश्यतेची ही दुष्ट रुढी एका फटकार्यासरशी नष्ट करून टाकणारी ही उदात्त घोषणा हेही ह्याचेच एक अखंडनीय नि आश्र्वासक प्रत्यंतर होय.
आज ह्या तीस कोटी हिंदुराष्ट्रात निर्बंधान्वये जन्मजात अस्पृश्य असा कोणीही उरलेला नाही. अग्निहोत्रं गवालम्भं नियोग: पलपैतृकम्। देवराच्च सुतोत्पत्ति:।। प्रभृति कालच्या अनेक रुढीप्रमाणे आजच्या स्मृतीत अस्पृश्यता ही लेखणीच्या एका फटकार्यासरशी कलिवर्ज्यात ढकलली गेली. आता ती पाळणे हेच पाप होय. स्पृश्य, अस्पृश्य इत्यादी शब्द आणखी काही काळ वस्तुस्थितीचा उलगडा करण्यापुरते काय ते वापरले जातात, वळवळत राहतील, पण नांगी छाटून टाकलेल्या विंचवाप्रमाणे त्यांच्यातील हीनार्थाचा दंश होण्याचे भय कोणासही उरू नये अशा निरुपद्रवीपणाने आता अस्पृश्यतेची रुढी प्रथम का पडली, केव्हा पडली, कोणी पाडली, का टिकली इत्यादी प्रश्र्नांची चर्चा ही केवळ ऐतिहासिक संशोधनाचा, पंडिती वादाचा किंवा वितंडवादाचा विषय. ती कालची कथा. आजला त्याचे काहीच सोयरसुतक उरलेले नाही. कारण, जन्मजात अस्पृश्यता आज मेली! आज हिंदुस्थानातील प्रत्येक हिंदुला स्पृश्य नागरिकत्वाचे समसमान अधिकार नि प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे. आता कोणी कोणाला हिणविण्यासाठी जन्मजात अस्पृश्य म्हणून म्हणणे हा सुद्धा निर्बंधान्वये दंडनीय अपराध ठरेल. यापुढे कोणत्याही महंमदअल्लींना- मुसलमान ख्रिश्र्चनातही जन्मजात अस्पृश्यता पाळली जाते ही गोष्ट छपवून ठेवून- भर कॉंग्रेसच्या अध्यक्षपदावरून अशी भोंदूपणाची मागणी करण्यास तोंड उरले नाही की, "हिंदू मुसलमानांच्या एकीसाठी हिंदूंतील आठ कोटि अस्पृश्यांची अर्धी वाटणी करू या!' कारण अर्ध्यां वाटणीसाठी हिंदूंत आठ कोटी अस्पृश्य तर काय, पण एकसुद्धा अस्पृश्य आज उरलेला नाही! आता मुसलमान ख्रिश्र्चनांतच जे अस्पृश्य आहेत त्यांनीच हवे तर हिंदु व्हावे! कारण आता जो जो जन्मजात अस्पृश्य हिंदुधर्मात पाय टाकील, त्याच्या त्याच्या पायांती, अस्पृश्यतेची जन्मजात बेडी आपोआप ताडकन् तुटून जाते!
पूर्वी एकदम "हिंदु आहोत तोपर्यंत अस्पृश्यता कालत्रयीही नष्ट होणार नाही!' अशा काहीशा आततायी भविष्यवादाने भिवून एका अस्पृश्य गटाने "आम्ही मुसलमान होणार' म्हणून त्रागा केला होता. तेव्हा सन १९३६ च्या आगेमागे आम्ही महारबंधूंशी मनमोकळा विचारविनियम ही लेखमाला लिहिली होती. त्यात आमच्या महार धर्मबंधुंना आम्ही तर्कागत निश्र्चितीने आश्र्वासिले होते की, जर चालू वेगाने हिंदू संघटनांचे आंदोलने आपण सर्वजण मिळून रेटीत गेलो, आम्ही अस्पृश्यतेच्या मुळावर असेच घाव घालीत गेलो, तर धर्मांतराचा निष्फळ नि आत्मघातक आततायीपणा न करताही दहा-वीस वर्षांच्या आत हा अस्पृश्यतेचा विषवृक्ष उन्मळून पडू शकेल! आज जे आश्र्वासन बहुतांशी सत्य ठरलेले आहे. आता "हिंदूधर्मात वा समाजात अस्पृश्यता आहे, म्हणून आम्ही धर्मांतर करणार' अशा भ्रामक त्राग्याचा किंवा पोकळ धमकीचा कणाच मोडून पडला आहे. नांगीच छाटली गेली आहे! ह्या उपरही ज्या मूठभर वा मोटभर मंडळींना धर्मांतर येनकेन प्रकारेण करावयाचेच असेल त्यांनी ते सुखेनैव करावे, आम्हास आता त्याची क्षिति वाटण्याचे कारण नाही. त्याने मोठीशी क्षति होणार आहे असेही नाही.
एकंदरीत, मानव्याच्या दृष्टीने काय किंवा आपल्या हिंदुराष्ट्रात दृष्टीने काय, झाले हे फार चांगले झाले. आमच्या स्वतंत्र भारतीय महाराज्यास शोभेल अशीच तिच्या घटना परिषदेची ही भव्य घोषणश महनीय आहे. उदात्त आहे, उदार आहे. शस्त्राच्या धारेचा ओरखडाही न ओढला जाता केवळ मानवी मूल्यांच्या शास्त्राधारानेच मिळविलेला हिंदुराष्ट्राच्या सत्प्रवृत्तीचा हा एक राष्ट्रीय विजय होय.
म्हणूनच अशी एक दुर्घट समाजक्रांतीकारक सुधारणा घडून आल्याचे शुभ वर्तमान आमच्या लेखणीस रक्तांश्रूत लिहावे न लागता आनंदाश्रूत उद्घोषिता येत आहे की, जन्मजात अस्पृश्यतेचा अंत झाला!' आमच्या चार कोटी हिंदु बांधवांची त्या दुष्ट शापापासून मुक्तता झाली, स्वतंत्र होताच भारतीय राष्ट्रदेवीने त्यांना केवळ नैतिकच नव्हे तर नैर्बंधिक समानतेचा उ:शाप दिला!
म्हणूनच, "अस्पृश्यतेचे उच्चाटन करा! जन्मजात जातिभेदाचेच उच्चाटन करा!' म्हणून गेला पंचवीस वर्षे प्रचार करता करता झिजून मोडत आलेल्या ह्या आमच्या लेखणीस ती झिजून मोडून जाण्याच्या आधीच आज हा जन्मजात अस्पृश्यतेचा मृत्युलेख तरी लिहिण्याचा सुयोग आला याविषयी त्या प्रकरणापुरती कितीतरी कृतार्थता वाटत आहे!
जवळजवळ पंधरा वर्षांपूर्वी रत्नागिरीच्या जातिभेदोच्छेदक आंदोलनाने शाळांतून स्पृश्यास्पृश्य मुले सरमिसळ बसविण्यापासून तो थेट प्रकट सहभोजनापर्यंतच्या प्रत्यक्ष व्यवहारातूनसुद्धा जन्मजात अस्पृश्यतेचा नायनाट करून टाकण्यात आलेला होता. अस्पृश्यांचे "पूर्वास्पृश्य' करून सोडले होते तेव्हा त्या स्थानिक कार्यसिद्धीची कृतार्थता ज्या गीतात व्यक्तविली होती तेच गीत आज आपल्या भारतीय महाराज्यातून त्या अस्पृश्यतेचा नायनाट झालेला पाहून जी कृतार्थता आज वाटत आहे तीही अखिल भारतीय प्रमाणात व्यक्तवू शकते की, आज आम्ही तीस कोटी हिंदुहिंदूतील अस्पृश्यतेचे- हे सुतक युगांचे सुटले.
विधिलिखित विटाळहि फिटले
जन्माचे भांडण मिटले
शत्रूचे जाळे तुटले
जे ग्रामबहिष्कार्य! आत त्या आणी
बाहेर गांव जावोनी।।१।।
पण! अस्पृश्यता कोणत्याही स्वरुपात पाळणे हे निर्बंधान्वये निषिद्ध ठरले तरी व्यक्तींच्या जीवनात आणि पळापळाच्या व्यवहारात त्या निर्बंधाची कार्यवाही अजून व्हावयाची आहे. निर्बंध स्वीकृत झाला. पण - पण तो अजून कृतकार्य व्हावयाचा आहे! अस्पृश्यता मेली- पण तिचे और्ध्वदेहिक अजून उरकायचे आहे!
त्यांचे काय? ती चर्चा आता या लेखाच्या उत्तरार्धात करू.
- Login to post comments