अमेरिकेतील गुलामगिरीचे उच्चाटन आणि हिंदुस्थानात अस्पृश्यतेचे उच्चाटन

    मुसलमानी धर्मशास्त्रात दासप्रथा- गुलामगिरी- ही  संमतिलेली आहे. इतकेच नव्हे तर युद्धात पाडाव केलेल्या काफरा च्या प्रकरणाप्रमाणे प्रसंग विशेषी त्यांना गुलाम करा' म्हणून आज्ञापिलेली आहे. ख्रिश्र्चन धर्मात दासप्रथा आज्ञापिलेलीं नाही तथापि अनुज्ञापिलेली आहे. "स्लेव्हस्‌, ओबे युवर मास्टर्स' हे ख्रिस्ती शास्त्रीय वचन प्रसिद्धच आहे. मुसलमानांनी गुलामगिरी नष्ट करण्याची घोषणा कधी केलेलीच नाही. परंतु ख्रिश्र्चन राष्ट्रांपैकी अमेरिकेने तेवढे ते सत्साहस करून तिच्या कॉंग्रेसद्वारा, "स्लेव्हरी इज अबॉलिश्ड' अशी मानवाच्या दृष्टीने महनीय असलेली घोषणा केली. गुलामगिरी आणि अस्पृश्यता या दोन दुष्ट रुढीत दुष्टतर कोणती याची चर्चा इथे अप्रस्तृत  असल्यामुळे इतके सांगणे पुरे आहे की, आमच्या भारतीय राज्यघटनेने अलीकडेच केलेल्या "अनटचेबिलिटी इज अबॉलिश्ड' या घोषणेशी महनीयतेत तुलना करण्यासारखीच अमेरिकन कॉंग्रेसने पूर्वी केलेली "स्लेव्हरी इज अबॉलिश्ड' ही घोषणा होती. परंतु गुलामगिरी चालू ठेवण्यातच विशिष्ट हितसंबंध, वर्णाहंकार, जन्मजात श्रेष्ठत्वाची भावना इत्यादी ज्या गोष्टी निगडीत झालेल्या होत्या त्या सर्वांवर आपण होवून अकस्मात पाणी सोडणे हे अमेरिकनांनाही इतके असह्य वाटले की, त्याराष्ट्रात गुलामगिरी नष्ट करण्याची आज्ञा सोडणार्‍या कॉंग्रेसच्या संयुक्त राज्यसत्तेविरुद्धच लक्षावधि नागरिकांनी शेवटी शस्त्र उपसले! यादवी युद्ध माजून सारे अमेरिकन राष्ट्र भ्रातृहत्येच्या रक्तात न्हावून निघाले. अनेक लढाया लढल्यानंतर शेवटी कॉंग्रेसच्या उत्तर अमेरिकन सैन्याचा संपूर्ण विजय झाला. तेव्हा त्या शस्त्रबळानेच काय ती शरणागतीची अट म्हणून दक्षिण अमेरिकेवर गुलामगिरी नष्ट करण्याची प्रथा लादता आली. न्यायदेवतेची आज्ञा रणदेवतेच्या पाठिंब्यानेच काय ती व्यवहारविता आली! परंतु आजच्या भारतात? अस्पृश्यता पाळणे हे कर्तव्य आहे.- नव्हे, तो एक धर्माचार आहे अशी विकृत असली तरी प्रामाणिक भावना ज्या कोट्यनुकोटि स्पृश्यांच्या हाडीमांसा आज शतकानुशतके रुळत आली आहे. त्यांना अस्पृश्यता पाळणे हा निर्बंधानुसार एक दंडनीय अपराध समजला जाईल. असे दरडावून सांगणारी ही घोषणा झाली असताही ती उलथून पाडण्यासाठी त्या स्पृश्यांच्या गोटात आपापसामध्ये तसे अमेरिकेसारखे भ्रातृहत्यारी, रक्तपाती नि सशस्त्र यादवी युद्ध जुंपण्याचा आज लेशमात्रही संभव उरलेला नाही. उलट पक्षी वर दाखविल्याप्रमाणे ज्या प्रत्येकीत लक्षावधि स्पृश्य सभासद आहेत अशा बहुते अखिल भारतीय संस्था आमच्या राज्यघटना परिषदेने केलेल्या त्या अस्पृश्यता निर्दालनाच्या घोषणेस मन:पूर्वक आसेतुहिमाचलपर्यंत स्वागतीत आहेत! या संतोषजनक वस्तुस्थितीचे मुख्य कारण हेच की, अखिल भारतातील स्पृश्य हिंदूंमधील विचारशील, न्यायप्रिय आणि मुखर अशा लक्षावधि स्पृश्यांना अस्पृश्यता पाळण्यात आपल्या हातून घडत आलेल्या पापाविषयी मन:पूर्वक पश्र्चाताप वाटला आणि त्यांनी आपण होऊन ती दुष्ट रुढी उखडून टाकली- त्या पापाचे हे राष्ट्रीय प्रायश्र्चित स्वेच्छापूर्वक घेतले.

    अशा राष्ट्रीय प्रायश्र्चित्तात आपल्या हातून मागे पाप घडल्याची जी जाणीव अनुस्यूत असते त्यामुळे ती प्रायश्र्चिते अपमानास्पद ठरत नाहीत, तर उलटपक्षी भूतकालीन अन्यायास लोककल्याणार्थ आपल्या आकुंचित अहंकाराचा नि स्वार्थाचा बळी देवून स्वेच्छेने परिमार्जिण्यात जे महनीय नीतिधैर्य प्रकटविले जाते त्यायोगे ती प्रायश्र्चिते त्या राष्ट्रांची गौरवास्पद विभूषणेच ठरतात.