शेवटी, व्यक्तीच्या मन:क्षेत्रातून या अस्पृश्यतेच्या दुष्ट भावनेचे उच्चाटन करा!
हे काम तरी ज्याच्या त्याच्या हातचे आहे ना? स्वधर्महितासाठी, स्वराष्ट्रहितासाठी, माणुसकीसाठी प्रत्येक हिंदु स्त्रीपुरुषाने "मी माझ्यापुरती तरी जन्मजात अस्पृश्यता पाळणार नाही' असे व्रत घेतले, नि त्याप्रमाणे आपल्या आचरणात ते आणून सोडले तरी केवढे काम होणारे आहे. या निर्बंधामुळे जातिविषयक बहिष्काराचे भय नष्ट झाले आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीला या प्रकरणी कितीतरी काम करता येईल. परवा येथील दादर भगिनी समाजाच्या एका कुटुंबवत्सल, प्रतिष्ठित नि पुढारी महिलेने आपल्या घरी अवाष्ण बोलवायची होती तेव्हा एका पूर्वास्पृश्य महिलेलाच बोलावून सपंक्त भोजन केले. अशा वैयक्तिक कृत्याचाही किती दूरवर परिणाम होतो! हिंदुसभेने महाराष्ट्रभर प्रचलविलेल्या अखिल हिंदु हळदीकुंकवाच्या समारंभाची पद्धतीही फार उपयुक्त आहे.
अशा अनेक प्रकारांनी, अनेक बाजुंनी, अनेक संस्थांनी नि असंख्य व्यक्तींनी मिळून असे देशव्यापी आंदोलन जर उभारले, तर अवघ्या दोनतीन वर्षात भारताच्या कोनाकोपर्यातूनही जन्मजात अस्पृश्यतेचा मागमूस उरणार नाही. पण हे केले पाहिजे! "केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे.'
इतक्या निकराने हे सहजसाध्य काम आपण उरकून टाकले पाहिजे की, आपल्या पूर्वास्पृश्य बंधूंच्या मनात आत्मविश्र्वासाची नि आत्मोद्वारक्षमतेची उदंड स्फूर्ति संचरावी. त्या स्फूर्तीमुळे त्यांनी होवूनच सांगावे की, "अस्पृश्य जातीत'ला म्हणून ज्या सवलती नि विशिष्टाधिकार राज्यघटनेत आणखी दहा वर्षेपर्यत तरी आम्हास दिलेले आहेत. ते आम्हास नको आहेत. कारण आम्ही अस्पृश्य नाहीच. अस्पृश्य म्हणून दिलेली प्रत्येक सवलत म्हणजे आमच्या हीनतेचे एकेक प्रमाणपत्र आहे! अस्पृश्य म्हणजे मिळणारा एकेक विशिष्टाधिकार म्हणजे आमची अस्पृश्यतेची दुबळी भावना आमच्यात सतत जिवंत ठेवणारे एक स्मृतिपदक आहे! आमच्या आत्मसन्माला बट्टा लावणारा तो विशिष्टाधिकाराचा बिल्ला आमच्य छातीवर लटकावण्यास आम्ही सिद्ध नाही. त्या कुबड्यांवाचून आम्ही आमच्या इतर स्पृश्य बांधवांप्रमाणेच स्पृश्य म्हणून प्रगति करू शकू!' हे आम्ही रागाने म्हणत नाही, तर राष्ट्रप्रेमाने, राष्ट्रहितार्थ!'
अशी धीरोदात्त वृत्ती आजही आमच्या पूर्वास्पृश्य धर्मबंधुपैकी काही पुढर्यांच्या मनात स्फुरत आहे हे आम्हास ठाऊक आहे. पुरावा म्हणून हा घ्या. गेल्या २१ सप्टेंबरला वर्हाड मधील दलित वर्गातील पुढार्यांची सभा परतवाडा येथे भरली होती. वर्हाडातीलच नव्हे तर भारतातील दलित वर्गाच्या पुढार्यामध्येही ज्यांचे स्थान प्रथम श्रेणीत असते ते श्री. गवई हे या सभेच्या अध्यक्षपदी होते. नव्या घटनेप्रमाणे मिळणार्या सवलतीसंबंधी दलित वर्गाचे धोरण काय असावे ह्या विषयी विचार चालू होता. तेव्हा अध्यक्षपदावून श्री. गवई ह्यांनी जे भाषण केले. त्यातील एकेक शब्द लाखाचा होता. त्यांच्याच वाक्यात या लेखाचा समारोप करू. ते म्हणाले-
"मला स्वत:ला तरी राखीव जागा नि सवलती यासंबंधी मोठासा आनंद वाटत नाही. कारण त्यामुळे आमच्या लोकांत (पूर्वास्पृश्यात) हीनपणाची भावना, न्यूनगंड उत्पन्न होतो आणि उरलेल्या हिंदु समाजापासून तुटकपणाची जाणीव कायम राहण्याला मदत होते. राष्ट्राच्या वाढीसाठी ही गोष्ट विघातक आहे. आम्ही अस्पृश्य आहोत हेच मुळात आता सर्वांनी विसरावे आणि सवलतीवर फारसा भर देवू नये. तथापि, आपली शक्ति आपण सर्वसाधारण अशा राजकीय नि सामाजिक कार्यासाठी संघटित करावी.'
- Login to post comments