आजच्या वस्तुस्थितीची उडती पहाणी

    इंदूर येथे चांभाराची दाढी करण्यास नकार दिल्यामुळे मध्य भारतातील गारोथ गावच्या एका न्हाव्याला मॅजिस्ट्रेटने पंचवीस रुपये दंड ठोकल्याचे समजते. आणखी असेच दोन खटले कोर्टात चालू आहेत.

    अक्कलकोट येथून तीन मैलांवर असलेल्या नणसगोळ या गावी स्पृश्य नि अस्पृश्य वर्गामध्ये दुफळी पडली आहे. हरिजन बंधूंना पिण्यास पाणीसुद्धा मिळू न देण्याचे यत्न स्पृश्य करीत आहेत. काही स्पृश्य प्रमुखांनी अस्पृश्यांना तुम्ही गाव सोडा, नाहीतर ठार मारू' अशी धमकी दिल्याचे समजते. बैल चोरल्याच्या आरोपावरून पोलिस इन्स्पेक्टरने तीन हरिजनांना अटक केली आहे. हरिजन म्हणतात की, आमच्यावर खोटे आरोप करून स्पृश्य त्रास देत आहेत. या तालुक्यात इतरत्रही असे प्रकार घडत आहेत.

    अशा प्रकरणी केवळ स्पृश्य किंवा केवळ अस्पृश्य सर्वतोपरी दोषी असतात असे नाही. तरी अशा ठिकाणी सरकारी अधिकार्‍यांनी तात्काळ जाऊन नीट चौकशी करावी. कोणत्याही दोन गटात तंटेबखेडे होणे निराळे. त्यांचा बंदोबस्त त्या दृष्टीने व्हावा. पण अस्पृश्य म्हणून त्यांना स्पृश्य लोक समान अधिकार देत नसतील, तर मात्र ते अधिकार नि विशेषत: नदी विहिरीवरील समान उपभोगाचे अधिकार अस्पृश्यांना तात्काळ देववून त्यांना काही दिवस रक्षण द्यावे. ते अधिकार नाकारणार्‍या स्पृश्यांना नैर्बधिक शासन करावे. म्हणजे तशा कडक शासनाच्या वचकामुळे इतरत्र होणारे अशा प्रकारचे अन्याय स्पृश्य करू धजणार नाहीत. अस्पृश्यांचा अतिरेक असला तर त्यांनाही शासन व्हावे.

    उमरखेड (नागपुर) या बाजुचे एक प्रसिद्ध कॉंग्रेस पुढारी, पावसाडा येथील मथुराप्रसाद तिवारी ह्यांनी गावच्या विहिरीवर पाणी भरता कामा नये असा अस्पृश्यांना धाकदपटशा दिला. त्यायोगे हरिजन खवळले. तेव्हा तिवारी ह्यांनी आपल्या अनुयायांकरवी हरिजनांवर लाठी हल्ला चढविला. पोलिस सब इन्स्पेक्टरने तिवारीजींना आता पकडले आहे. हे प्रकरण आपसांत दाबून टाकण्याचा प्रयत्न होत आहे.

    कोकणात काही ठिकाणी महार लोकांनी मेलेले गुरे ढोरे ओढण्याचा आपला पूर्वापार व्यवसाय हीन होय म्हणून करण्याचे नाकारले. तेव्हा गावकर्‍यांनी रागावून रुढीप्रमाणे महारांना जे बलुते द्यावयाचे ते बंद केले. त्यामुळे बलुते मिळण्याचा आपला "हक्क' बजावून घेण्यासाठी गावकर्‍यांवर महार लोक कोर्टात दावा लावण्याचा बेत करीत आहेत.

    ढोरे फाडण्याचा धंदा रुढीप्रमाणे जे करीत नाहीत अशा अस्पृश्य जातीच्या काही मंडळींनी आपण ढोरे फाडण्याचा धंदा करावा म्हणून ठराव केला. हे कळताच मुंबईच्या त्यांच्या जातभाईंनी सभा घेवून असा धंदा रुढीविरुद्ध केल्यास जातिबहिष्कार घालू म्हणून त्यांना धाक घातला!

    रामपूर (संयुक्त प्रांत) येथे न्हाव्यांनी आमच्या दाढ्या कराव्यात, धोब्यांनी कपडे धुवावेत आणि नगरपालिकेने आमचा पगार वाढवावा, अशी मागणी एक हजार भंग्यांनी केली आहे.

    कोल्हापूरकडील शिरोळे येथे हरिजन दिवशी हरिजनांनी उपहारगृहात प्रवेशाचा प्रयत्न केला म्हणून लोकांनी काही दिवसांपासून त्यांच्यांवर आर्थिक बहिष्कार घातला आहे. हरिजनांनी मामलेदाराकडे मोर्चा नेवून गार्‍हाणे केले, प्रकरण वरिष्ठ अधिकार्‍यांकडे मामलेदारांनी धाडले. (अशा ठिकाणी लाल फिती च्या द्राविडी प्राणायामात कालहरण न करता, स्थानिक अधिकार्‍यांनी पूर्वास्पृश्यांना तत्काळ संरक्षण देवून आगळीकवाल्यांना शासन केले पाहिजे.)

    लोणंदकडील शेरीवाडी येथे ज्या आडावर हरिजनांनी पाणी भरले त्या आडावर गावाने बहिष्कार घातल्याचे कळते.

    अकोला येथील गुलझार पुर्‍यातील एक हरिजन स्त्री नदीवर पाणी भरण्यास गेली असता तिला स्पृश्य जातीच्या महिलांनी बंदी करून ती बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली. त्या अस्पृश्य स्त्रीने दावा भरला असून पोलिस तपास चालू आहे. (अशा प्रकरणांची माहिती सरकारने प्रसिद्धावी, चौकशीत आगळीक खरी कोणाची ठरली, त्यासाठी कोणास काय शासन झाले, ही अधिकृत बातमी वृत्तपत्रांतून सरकारने प्रसिद्धीली असता तिच्यामुळे इतरत्रही तशी आगळीक करू पहाणार्‍यांना वचक बसेल. अशी प्रकरणे झटपट निकालात काढली पाहिजेत.)

    साकुर्ली (जि. ठाणे) या गावी गेल्या हरिजनदिवसापासून स्पृश्यास्पृश्यांत वैमनस्य येऊन हरिजनांची गुरे कोंडवाड्यात घालणे, शेतीकामाला अडथळा करणे, हरिजन स्त्रियांना धमक्या देणे असा त्रास होत आहे. हे प्रतिवृत्त ना. तपासे ह्यांच्या कानावर घातले गेल्यामुळे पोलिस इन्स्पेक्टरना बंदोबस्तासाठी सरकारी आज्ञा झाली आहे.

    फलटणला हरिजन सिवसानिमित्त तिकडचे कॉंग्रेस अध्यक्ष श्री. भगत यांच्या प्रमुखत्वाखाली जी सभा झाली तीत काही हरिजन वक्त्यांनी त्यांना विचारले की, "तुम्हाला वर्षाकाठी एक दिवस तेवढा हरिजनप्रेमाचा पुळका का येतो! कॉंग्रेस अधिवशनाकरिता तुम्ही बावीस हजार रुपये इकडून जमविलेत. पण सार्वजनिक संडास नि दिव्यासाठी चाललेली आमची आबाळ दूर करण्यास पैसे नाहीत म्हणून म्हणता! आमच्या सार्‍या अडीअडचणी दूर न करता होणारे हे हरिजन दिवसांचे समारंभ आम्हांस दांभिकपणाचेच वाटणार.'

    अशाच प्रकारची भाषणे कित्येक ठिकाणी हरिजनांनी त्या दिवशीच्या सभांतून केलेली आहेत. आम्हांस नोकर्‍या द्या, राखीव जागा द्या, विशेष सवलती द्या, तर आम्ही अस्पृश्यता गेली असे समजू. असा त्यांचा सूर होता. काही ठिकाणी तर स्पृश्यास्पृश्यांची संमिश्र स्नेहसंमेलने करण्याच्या स्तुत्य हेतूने भरविलेल्या सभांवरही काही अस्पृश्य गटांनी बहिष्कार घालण्याचे अविचारी कृत्य केले.

    इतकेच नव्हे, तर दोन तीन ठिकाणी हरिजनदिनी पूर्वास्पृश्यांच्या काही गटशंनी मिरवणुका काढून "लढके लेंगे दलितस्थान' अशा अर्थशून्य, अविवेकी नि अहितकारक घोषणा करण्यासही मागे पुढे पाहिले नाही!

    मुंबईस "कोकण मित्र मंडळ' नावाची एक लहानशी पण कार्यकर्ती संस्था आहे. तिच्या ताज्या प्रतिवृत्तावरून दिसते की, काही खेडेगावी टपालवाले अस्पृश्य वस्तीत त्यांनी पत्रे वाटण्यास जात नाहीत. तर त्या बिचार्‍या अस्पृश्यांनाच हे टपालवाले जिथे असतील तिथे जावून आपली पत्रे आणावी लागतात! इतकी पायपीट केली तरी अस्पृश्यांचे द्रव्यटपाल (मनीऑर्डर) असल्यास त्यावर कोण्या स्पृश्याने सही केल्यावाचून ते शिक्षित अस्पृश्याला सुद्धा द्रव्य देत नाहीत. वरील "कोकण मित्र मंडळाने' असे काही अन्याय दूर केलेले आहेत.

महाराष्ट्र प्रांतिक हरिजन सेवक संघ

    ही संस्था महाराष्ट्रात प्रथमपासून अस्पृश्यता निवारणास्तव भरीव काम करीत आलेली आहे. या लेखात अस्पृश्यता दंडनीय ठरविली गेल्यानंतरच्या घटनांचा उल्लेख करणे असल्यामुळे वरील संस्थेचे गेल्या पाचसहा महिन्यांचेच काय ते कार्य पाहू. या संस्थेचे सध्याचे अध्यक्ष आहेत. श्री. विनायक बर्वे, विधिज्ञ, धुळे, ते "दलित सेवक' नावाचे एक वृत्तपत्र चालवितात. आज कित्येक वर्षापासून मुख्यत: कान्हदेशामध्ये अस्पृश्यता निवारणाच्या कार्यी ते अविरत परिश्रम करीत आलेले आहेत. त्यांच्या अध्यक्षत्वाखाली म. प्रा. हरिजन बजावणी महाराष्ट्रात ठिकठिकाणी परिणामकारक रीतीने करीत चाललेला आहे, ही समाधानाची गोष्ट होय. शक्य तितक्या मनमिळावूपणे वागत असताही दुराराध्य अन्यायाचे उच्चाटन करण्यास भागच पडेल तेथे वरील निर्बंधानुसार खटले करून, ज्याची आगळीक त्यास दंड करविण्याचे त्यांचे धोरण अगदी समर्थनीय आहे. त्यांच्या कार्याची माहिती व्हावी नि ती इतरांना मार्गदर्शक व्हावी या हेतूने त्या संघाच्या ऑगस्ट १९५० च्या प्रतिवृत्तातील काही कार्यांना येथे उल्लेखीत आहोत.

(१)  केल्या ऑगस्ट महिन्यात त्या संस्थेचे एक प्रचारक, श्री. मोरे यांनी पुणे जिल्ह्यातील फुरसुंगी, महंमदवाडी, लोणी काळभोर, थेऊर, वाडे, दापोडी, उंडी, केसनंद वाघोली, मांजरी, कोलवाडी, साष्टे, विवरी, सिरसवाडी, सहजपूर ह्या गावी जावून पूर्वास्पृश्य वस्तीची पाहणी करून त्यांना वरील निर्बंधाची माहिती दिली, आणि त्यांना त्या निर्बंधान्वये काय अधिकार नि सवलती मिळाल्या आहेत ते समजावून दिले.

(२) ठाणे जिल्ह्यातील प्रचारक श्री. मोईर ह्यांनी अनेक गावी जावून असाच प्रचार केला. पूर्णा येथील तिन्ही देवमंदिरात स्पृश्यास्पृश्यांसह प्रवेशून दर्शन घेतले. सरकगांव, वसई, उमरोली नि आंबेल या गावी उपहारगृहांतून हरिजनांना प्रवेश मिळवून दिला. कांबरा नि भिवंडी येतील हरिजनांची गार्‍हाणी अधिकार्‍यांच्या कानावर घातली.

(३) सातारा जिल्हा प्रचारक श्री. शिवदास यांनी शिवथर, वाटे, कामाठीपूरा, कोलवडी, सोनके प्रभृति पंधरावीस गावांना भेट देवून पूर्वास्पृश्य वस्तीतून वरील निर्बंध समजावून दिला. ह्या सर्व गावी पूर्वास्पृश्यांसह उपहारगृहात प्रवेशून सरमिसळ चहा घेतला. केशकर्तनालयांतून हरिजनांना नेवून स्पृश्यांप्रमाणेच काही भेदाभेद न होवू देता त्यांच्या दाढ्या करविण्यात आल्या, केस कापण्यात आले. या गावांपैकी चौदा ठिकाणी हरिजनांकडून सार्वजनिक विहिरीचे पाणी काढून घेतले. आठ ठिकाणी त्यांना देवळात नेवून देवदर्शन करविले. कान्हदेश जिल्ह्यात ह्या हरिजन सेवक संघाचे मुख्य केंद्रच असल्यामुळे तेथील गावागावातून अस्पृश्यता निवारक निर्बंधाची बजावणी सतत चालू आहे. अशा आखीव नि रेखीव पद्धतीने निर्बंधाच्या प्रत्यक्ष बजाविण्याचे जे कार्य म.प्रा. हरिजन सेवक संघाकडून चालू आहे त्याविषयी त्यांचे नि अध्यक्ष श्री. बर्वे यांचे आम्ही मन:पूर्वक अभिनंदन करतो. पक्षनिपेक्षपणे सर्व नागरिकांनी या कामी ह्या संघाशी शक्य ते ते सहकार्य करावे.

अखिल भारतीय डिप्रेस्ड क्लासेस लीग

    ही पूर्वास्पृश्यांची एक प्रतिनिधिक नि प्रमुख संस्था आहे. अनेक प्रांतिक मंत्री आणि इतर राज्यधिकारी हिच्या चालकात आहेत, ही विशेष महत्त्वाची गोष्ट होय. या संस्थेच्या कार्यकारी मंडळाची बैठक गेल्या सप्टेंबरमध्ये झाली. भारतीय लोकसभेचे सदस्य डॉ. धर्मप्रकाश त्या बैठकीचे अध्यक्ष होते. पंजाबीचे श्रमिक मंत्री श्री. पृथ्वीसिंग, उत्तर प्रदेशचे मंत्री गिरीधारीलालजी, मध्यप्रदेशचे मंत्री अग्निभोज, मद्रासचे मंत्री परमेश्र्वरम्‌, मुंबईचे मंत्री गणपतराव तपासे, नारायणराव काजरोळकर एम. एल. ए. सोनावणे एम. पी. इत्यादी पूर्वास्पृश्यांचे अखिल भारतीय पुढारी नि प्रमुख अधिकारी उपस्थित होते. त्या बैठकीच्या ठरावात म्हटले आहे की, "सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक उन्नतीच्या क्षेत्रात पूर्वास्पृश्यांची प्रगती नि जागृति होत आहे हे नि:संशय. तथापि नगरांतून नि खेड्यांतून त्यांना पाशविक पद्धतीने दडपण्यात येत आहे. याची पाहणी करण्यासाठी सरकारने एक समिती नेमावी आणि घटनेप्रमाणे मागासलेल्या वर्गात हितरक्षणार्थ जो अधिकारी नेमावयाचा तो स्वत: हरिजनच असावा. पूर्वास्पृश्यांचे स्वत:चे मनोगत कळावे यासाठी हा ठराव आम्ही हेतुत: इथे दिलेला आहे. तथापि ह्या अ.भा.डि. क्ला. लीगचा सर्वात महत्वाचा दूरदर्शी, हिंदुत्वनिष्ठ, निडर नि खणखणीत असा जो ठराव होता त्यात कार्यकारिणी म्हणते-

    आमच्या (पूर्वास्पृश्य) बंधुभगिनींना आमची अशी विनंती आहे की, त्यांनी कोणत्याही कारणासाठी आपला प्राचीन धर्म सोडू नये. प्रसंगपरत्वे ज्यांनी धर्म सोडला असेल, त्यांनी शक्य तितक्या लवकर आपल्या प्राचीन स्वधर्मात परत यावे.

    या देशाच्या बर्‍याच भागात काही काही जमाती आपली लोकसंख्या वाढविण्यासाठी इतरांना बाटविण्याचा प्रयत्न करीत असतात. ही कार्यकारिणीची अशा कारवायांविषयी अत्यंत तीव्र विषाद व्यक्तवीत आहे.

    आपल्या धर्मांतून बाटून परधर्मात गेलेल्यांना स्वधर्मात पुन्हा परत घेण्यासाठी आमच्या हिंदु बांधवांनीही शक्य ते ते साहाय्य करावे, अशी आमची यच्चयावत हिंदुमात्राला विनंती आहे.

    आमच्या पूर्वास्पृश्यबंधूंच्या ह्या कळकळीच्या विनंतीविषयी आम्हास इतके तरी सांगितल्यावाचनू पुढे जाववत नाही की, "धर्मबंधुंनो नि देशबंधुनो, तुम्ही अशा हिंदुत्वरक्षणाच्या पवित्र कार्यी इतर हिंदूंना तुम्हास साहाय्य देण्याची विनंती कशी करता?' हे तुमचे स्वधर्मप्रेम नि शालीनता पाहून आम्हांस लज्जेने मान खाली घालावीशी वाटते!' विनंती नव्हे! हिंदुधर्म रक्षणाच्या कार्यी तुम्हास साहाय्यच नव्हे, तर तुमच्य खांद्याशी खांदा लावून झुंजण्याची, सहकार्य करण्याची तुमच्या इतर हिंदुबांधवांना "आज्ञा' करण्याचा तुम्हास अधिकार आहे. ती पाळण्याचे त्यांचे कर्तव्य आहे. पुन्हा हेही ध्यानी असावे की, जे आपले धर्मबंधु बळाने वा छळाने, अनिच्छेने वा भ्रांत इच्छेने पूर्वी परधर्मात गेले त्यांना आपल्या हिंदु धर्मात परत येण्यास आता त्यांच्या एका इच्छेविना दुसरी कोणतीही आडकाठी उरलेली नाही. गेल्या तीनचार वर्षात क्रांतिकालीन धुमाळीत आपल्या हिंदुराष्ट्राला उपोद्धलक अशा ज्या काही असाध्य गोष्टी साध्य झाल्या, त्यात जशी जन्मजात अस्पृश्यता दंडनीय ठरवली ही एक गोष्ट आहे, तशीच शुद्धि स्वयमेव मंडनीय ठरली ही दुसरी गोष्ट आहे! ह्या वा त्या उनष्टुपाच्या आधारे नव्हे, ह्या वा त्या पीठाच्या प्रेरणेने नव्हे, तर हे स्वयमेव हिंदु राष्ट्रच्या राष्ट्र कोण्या दैवी उन्मादाच्या झटक्यात झपाटले जावून, मध्यंतरी काही शतके वज्रकठीण अडसरांनी गच्च बंद केले गेलेले ते शुद्धीचे महाद्वार सताड उघडून देते झाले! शक हुणांच्या काळात एकेका यज्ञासरशी परकीयांच्या जातींच्या जाति शुद्ध करून स्वधर्मात आम्ही सामावून घेतल्याचे जे चमत्कार आम्ही हिंदु राष्ट्राच्या पुराणेतिहासात वाचतो तसे काही चमत्कार गेल्या तीन चार वर्षाच्या क्रांतिकाळात डोळ्यांदेखत घडले आहेत. शत्रूने बळाने बाटविलेल्या हिंदु स्त्रीपुरुषांचे तांडेच्या तांडे लढत, पडत झडत शत्रूच्या हातून सुटून आपल्या ह्या पितृभू- पुण्यभू भारताच्या आजच्या तात्कालिक सीमांच्या आत शिरताच आपोआप शुद्ध होऊन हिंदुराष्ट्रात सामावून गेल्या. ह्या पुण्यभूमीचा स्पृश्य हाच आजचा अनन्य शुद्धिसंस्कार ठरला! बळाने भ्रष्टविलेल्या हिंदु स्त्रीपुरुषांचीच गोष्ट कशाला? अगदी जन्मजात होऊ इच्छितो' असे म्हणताच रजपूत जाटांसारख्या कट्टर हिंदूंनीसुद्धा नुसत्या शेंडीवारी शुद्ध करून घेतले, समाजात सामावून टाकले. ही डोळ्यादेखत घडत असलेली उदाहरणे आहेत! पूर्वी बाटलेल्या पूर्वास्पृश्य हिंदु बांधवांना आपल्या पूर्वजार्जित हिंदुधर्मात येण्याची इच्छा होण्याचा काय तो अवकाश आहे! आता अस्पृश्यतेची बेडी तुटली आहे, शुद्धीचे महाद्वार सताड उघडलेले आहे. गंगामाईचे पाणीसुद्धा शुद्धीसाठी शिंपडणे अवश्य नाही. आपल्या घरी परत येऊन आपल्या अंतरलेल्या धर्मबंधूंना मायलेकरांना भेटताच जे प्रेमाचे नि राष्ट्रीय आनंदाने अश्रू तुमच्या आमच्या डोळ्यातून वाहतील त्यांचे जे सिंचन तीच शुद्धि! तेवढात काय तो संस्कार.

जात्युच्छेदक हिंदुमहामंडळ

    केरळ प्रांतातील त्रावणकोर कोचीनकडील मोठमोठ्या पंचवीस-तीस स्पृश्यास्पृश्यांच्या जातिसंस्थांनी आपापले विसर्जन करून हे महामंडळ स्थापिले आहे. त्या त्या संस्थेची लक्षावधि रुपयांची मत्ता नि निधीही महामंडळाच्या हाती दिली आहे. केवळ अस्पृश्यतेचेच नव्हे तर जन्मजात जातिभेदांचेच उच्चाटन करूनन जातिपातिनिर्विशेष अशा हिंदु समाजाची (ए कास्टलेस हिंदू सोसायटी) निर्मिति करण्याचा ह्या महामंडळाचा एक प्रमुख उद्देश आहे. विधिमंडळातील अनेक हिंदू सभासद या महामंडळास मिळालेले असून हिंदुपक्षाच्या नावावर एक चुरशीची निवडणूनकही त्यांनी गेल्या महिन्यातच जिंकली आहे. त्यांच्या राजकीय कार्यक्रमाची बाजू या लेखाच्या कक्षेबाहेरची आहे. परंतु जन्मजात अस्पृश्यता नि जातिभेद ह्यांच्या उच्चाटनाचे जे प्रकट प्रयत्न जितक्या मोठ्या प्रमाणावर ह्या प्रमुख संस्थेकडून होताहेत त्याविषयी सद्य:परिस्थितीच्या या पाहणीत अभिनंदनपूर्वक उल्लेख करणे कर्तव्यच होते.

    वरील मोठमोठ्या संस्थाच्या मानाने पुष्कळच लहान असलेल्या; परंतु, जातिभेदोच्छेदनास्तव आपल्या शक्तीप्रमाणे, शक्य ते ते, कार्य प्रत्यक्षपणे, करून दाखविणार्‍या, एका एकमुखी संस्थेचा तेवढा, जाताजाता, उल्लेख करू. त्या संस्थेचे नाव आहे श्रीयुत अनंत हरि गद्रे! वीस वर्षांपूर्वी, त्यांच्या झुणका भाकर सहभोजन संघाने, महाराष्ट्रात केवढी तरी खळबळ उडवून दिली. सध्या फारसे साहाय्य नाही;  साधने नाहीत. तरीही तुटपुंज्या परिस्थितीसुद्धा, तितकेच परिणामकारक कार्य करणारा एक डोकेबाज तोडगा त्यांनी काढला आहे. तो, म्हणजे, "झुणका भाकर सत्यनारायण.' जीत, जमेल त्या चाळीत, जावयाचे; एका पूर्वास्पृश्य जोडप्याच्या हातून, एका टुमदार सत्यनारायणाची, प्रकटपणे पूजा करावयाची; आणि एका टीचभर भाकरीच्या तुकड्यावर चिमुटभर, खमंग झुणका ठेवून, तो प्रसाद, अवती भोवती गोळा झालेला, लोकांना त्या पूर्वास्पृश्य महार, भंगी, धेड, धर्मबंधूंच्या हाताने, सांगूनसवरून, वाटावयाचा; हा साधा खाक्या, पण, सत्यानारायणाची कृपा, अशी की, चाळी चाळीतून आब्राह्मणचांडाळ स्त्रीपुरुष, मुलेबाळे, सुशिक्षित-अशिक्षित शेकड्यांनी त्या पूजेभोवती गोळा होतात; नि पूर्वास्पृश्यांच्या हातचा, तो प्रसाद, समजून घेऊन उभ्याउभ्याच खाऊन चट्टामट्टा करून टाकतात. जंतूघ्न औषधांचा फवारा मारताच, सूक्ष्म रोजजंतु, जसे न दिसताच, पटापट मरून जातात; तसेच, ह्या झुणका भाकरीच्या, प्रसादाच्या घासासरशी, समाज मनासातील जन्मजात जातिभेदाच्या, भ्रांत भावनेने, जंतु नकळत मरून जातात. एखाद्या दहा हजार रुपये खर्चून भरविलेल्या अस्पृश्यता निवारणाच्या, व्याख्यानबाज अधिवेशनापेक्षा, अवघ्या, दहा रुपयांनी होणारा, हा, झुणका भाकर सत्यनारायराचा सक्रिय समारंभ  अस्पृश्यतानिवारणाचे नव्हे; तर, जात्युच्छेदनांचेही कार्य अधिक परिणामकारकपणे करीत आहे. आणि तेही केवळ सामोपचाराने!

    श्री. गद्रे हे वरील कार्य, जवळजवळ एकट्याच्याच बळावर करीत आहेत हे खरे असले तरी असे म्हणता येईल की, त्यांच्या एकटेपणाच्यामागे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव, हात देत उभा आहे. ते प्रसिद्ध संपादक आहेत. मुंबई प्रांतिक हिंदुसभेचे, ते अध्यक्ष होते: परंतु, तशी पूर्वीची प्रसिद्धी वा सार्वजनिक पुण्याई गाठी नसलेल्या, कोणाही सामान्य पण सत्प्रवृत्त नि निर्धाराच्या, नागरिकाला सुद्धा, तो , अगदी एकटा असला; तरी, अस्पृश्यतानिवारणाचे कार्य, ह्या निर्बंधाची प्रत्यक्ष बजावणी, पुष्कळशी कशी करता येते; त्याचेही एक उदाहरण देवून ही सद्य:स्थितीची पाहणी संपवू. इतर जिल्ह्यांप्रमाणेच, ठाणे जिल्ह्यातही, न्हावी लोक पूर्वास्पृश्यांची, श्मश्रू करीत नसत. स्वत:सच तो, अधर्म वाटे; किंवा लोकनिंदेची धास्ती किंवा जातगोत वाळीत टाकतील; म्हणून. पण हा निर्बंध संमत होऊन सात आठ महिने झाले तरी, न्हावीर असा, पूर्वास्पृश्यांची श्मश्रू काही करीना! हे पाहून अनगाव येथील श्रीयुत यशवंतराव लेले ह्या गृहस्थांनी, ह्या प्रकरणापुरती तरी ह्या निर्बंधाची प्रत्यक्ष बजावणी करण्याचे ठरविले. आजुबाजुच्या खेड्यातील न्हावी मंडळींना, नव्या निर्बंधाप्रमाणे, जन्मजात अस्पृश्य असे कोणालाही उल्लेखून; केवळ, त्यासाठीच त्याची श्मश्रू करण्यास नाकारणे; हा दंडनीय अपराध आहे, हे, त्यांनी बजावून सांगितले; दुसरीकडे पूर्वास्पृश्यांना आपला नवा अधिकार, बजावण्यास उद्युक्त केले. शेवटी, त्या गावच्या न्हाव्यांकडून, प्रत्येकी दोन पूर्वास्पृश्यांची दाढी करवून किंवा केस कापवून घेतले. पहिल्या दिवशी, "जातिवंत' न्हावी, जेव्हा "जातिवंत' अस्पृश्यांची श्मश्रू करू लागले; तेव्हा ते कौतुक पाहण्यास गारुड्याच्या खेळाभोवती, जमतात; तसे, अशिक्षित सुशिक्षितांचे संमिश्र थवे, भोवती जमले होते. निदान आणखी दोन एक महिने तरी, हा, कार्यक्रम चालविण्याचा श्री. लेले यांचा बेत आहे.

    वरील उडत्या पाहणीतील घटना नि प्रयत्न हे शितावरून भाताची परीक्षा करता यावी; ह्यापुरतेच उल्लेखिलेल असल्यामुळे, त्यावरून उभ्या भारतातील आजची, अस्पृश्यतेच्या संबंधीची, परिस्थिती कशी आहे; ते स्पष्ट होईल. तशा प्रकारचे, अनेक प्रसंग, हिंदुस्थानावर घडताहेत. ह्या, अस्पृश्यतोच्छेदक निर्बंधाची, बजावणी करण्याचे; असे, सांस्थिक किंवा वैयक्तिक प्रयत्नही, अनेक ठिकाणी चालू आहेत.

    अस्पृश्यता, दंडनीय ठरविणार्‍या, ह्या निर्बंधाची बजावणी कशी करावी; त्या विषयी काही सूचना वरील पाहणी करतानाच, ठिकठिकाणी केल्या आहेत. ह्या एका लेखात, निर्बंधबजावणीच्या देशव्यापी कार्यक्रमाची स्फुटश: (तपशीलवार) फोड करणे; अशक्य नि अनावश्यक आहे. तथापि, त्या, कार्यक्रमाच्या सर्वसाधारण, स्वरुपाविषयी नि धोरणाविषयी, काही मूलभूत सूचना, तेवढ्या, खाली देत आहोत.