स्वतःचे दोन शब्द

ते काय असणार ? पण ह्या दोन शब्दांतच चरित्र लेखनारंभाचे कथानक वाचकांना मला सांगावयाचे आहे.

रत्नागिरीच्या जेलमध्ये बॅ. सावरकर हे कैदी म्हणून असताना सुमारे दीड वर्षांपूर्वी तेथल्या राष्ट्रीय शाळेत मी एक विद्यार्थी होतो. एकदा बॅ. सावरकर हे फार सीक झाल्याचे वृत्त समजले. त्यावेळी त्यांचे बंधु डॉ. नारायणराव हे त्यांना भेटण्याकरिता आले होते. मी त्यांच्या बरोबर जाण्याचा यत्न केला ! पण यत्न केला इतकेच; कारण त्यात मला यश येणेच शक्य नव्हते. मनात एवढीच इच्छा की, बोटीतून उडी टाकून फ्रान्सचा किनारा गाठणाऱ्या - अगदी लहान वायातच अचाट साहस करून सर्व जगाचे डोळे आपणाकडे लावून घेणाऱ्या या नरवीराचे एकवार तरी दर्शन घडावे.

प्रयत्नाने सर्व काही साध्य होते म्हणतात. रत्नागिरीच्या तुरुंगातून मला एकदा कापड घेण्याची बुद्धी झाली ! व एक दिवस मी सुमारे चार वाजता त्या जेलच्या दरवाजावर गेलो. त्यावेळी तुरुंग, कैदीकाम वगैरे सर्वच नवी असल्यामुळे दरवाजाच्या आतून दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर मी नजर टाकीत होतो. इतक्यात एक कैदी आतच असलेल्या ऑफिसवर आला. पांच चार मिनिटे झाल्यावर जेव्हा तो परत जाऊ लागला तेव्हा जरा थांबला. इतक्यांत शिपाई आपसांत म्हणून लागले की, "सावरकरची प्रकृति आता ठीक दिसते.'' मी आत पाहिले - त्यावेळी ते एकवार दरवाजाकडे पाहून परत जाऊ लागले - मी त्यांच्या पाठमोऱ्या चालत्या शरीराला नमस्कार गेला - हेच त्यांचे दर्शन.

तेथे असतानाच त्यांची पदे ऐकण्याचा नादच लागला होता. ती म्हणण्याचा आवाजाच्या दृष्टीने नसला तरी प्रेमळपणाचा उमाळा माझा एक भाऊ आणि कसब्यातील एक बालवयी मित्र यांना वारंवार येत असे. ती पदें वैशाख महिन्यातल्या वद्य पक्षांतल्या एका रात्री वर उल्लेखिलेल्या गांवी म्हटली गेली व विचार करता करता असे ठरविले की, मिळेल तेवढीच माहिती मिळवून हे चरित्र आपण महाराष्ट्र जनतेसमोर ठेवावयाचे. पण हे ठरविण्याचे काम फारच सोपे होते. प्रत्यक्ष माहिती मिळविण्याचा आरंभ केला तेव्हा आपल्या हातून बहुधा हे कार्य तडीस जाणार नाही असे वाटू लागले. पण सावरकर ज्यावेळी "माखजन' येथे आले होते त्यावेळी त्यांचे स्नेही नागपूरचे प्रसिद्ध पुढारी श्री. विश्र्वनाथराव केळकर हेही आले होते. त्यांचेजवळ शब्द टाकून पाहिला. त्यांनी आनंदाने माहिती देण्याचे कबूल केले. तेथूनच कार्याला आरंभ झाला व पुढे श्री. गणेशपंत, डॉ. नारायणराव, श्री. भाऊसाहेब चिपळूणकर इत्यादी प्रेमी गृहस्थांचे मदतीने हे लहानसे कार्य तडील गेले. सर्व कार्य हे जर त्यांच्या प्रेमाचेच दृश्य तर मग मी आभार कोणत्या शब्दांत मानायचे ? बॅ. विनायकराव ह्यांना मी पुष्कळवेळा काही महत्त्वाच्या गोष्टी सांगण्याची विनंती केली. पण त्यांनी ती आभारपूर्वक नाकारली. बोटीतल्या उड्डाणाची हकीगत मात्र मोठ्या जिकिरीने सांगितली. या ठिकाणी एक गोष्ट सांगणे जरूर आहे की, मिळालेली सर्व माहिती जरी खरी असली तरी त्यांतले एखादे वाक्य अगर शब्द अगदी तंतोतंत खराच असेल असे मात्र सांगता येत नाही.

दे. भ. तात्यासाहेब केळकर ह्यांना प्रस्तावना लिहून देण्याची विनंती केली व ती त्यांनी स्वीकारली ह्याबद्दल; तसेच श्री. श्रीधर गोविंद उर्फ अण्णासाहेब भावे यांच्या अनेक प्रकारच्या मदतीबद्दल आणि माझ्या वडलांचे परम स्नेही श्रीयुत केशवराव म्हसकर यांनी केलेल्या निरनिराळ्या सूचनांबद्दल मी सर्वांचा फार आभारी आहे.

सदाशिव राजाराम रानडे

माखजन 15-08-24

संपूर्ण पुस्तक येथे उपलब्ध