राष्ट्रार्थ भव्य कृति काहि पराक्रमाची


प्रार्थना  

राष्ट्रार्थ भव्य कृति काहि पराक्रमाची

ईर्ष्या निजांतरि धरूनि करावयाची

ही हिंदुभू परमश्रेष्ठपदास न्याया

आम्ही कृती नित करू झिजवोनि काया || १ || 

विज्ञान-ज्ञान  अमुचे परिपूर्ण होवो

अभ्यास देशस्थितिचा समतोल चालो

निष्ठा विवेक प्रकटो मन पूर्ण शुद्ध

वर्तू अम्ही दृढप्रसन्न नि ध्येयधुंद || २ || 

होती अनेक हृदये जरि एकरूप

सामर्थ्य तेथ प्रकटेल तरी अमूप

हा मंत्र संघरचनार्थ सदा जपू या

हे ज्ञान-कर्म-युत भक्ति-व्रत आचरू या || ३ || 

की पुण्य-श्रेय-यश-कीर्ति सदैव लाभो

निंदा-प्रहार अथवा नच कोणि लोभो

आशा असो विमल वा भिववो निराशा

सोडू कधी न पथ हा चिर ठेवु आशा || ४ || 

दाही दिशांत घुमुनी जयनाद जेव्हा

होई अखंड प्रियभूमि अजिंक्य तेव्हा

हृन्मंदिरातिल निवेल तृषा कधीची

हे देव आस पुरवी तव पूजकांची  || ५ || 

की घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने

लब्ध-प्रकाश-इतिहास-निसर्गमाने

जे दिव्यदाहक म्हणोनि असावयाचे

बुद़्ध्याचि वाण धरिले करि हे सतीचे  || ६ ||