ही सुधारणा आमच्या हिंदुराष्ट्रावर कोण्या अहिंदु शक्तीने बळाने लादलेली नाही

    अस्पृश्यतेचा नायनाट करणारी ही घोषणा मोगली किंवा इंग्रजी राजवटीसारखी कोण्या परकीय राष्ट्राने आमच्यावर लादलेली नाही किंवा आम्हास तलवारीच्या धारेवर धरून आमच्या मनात नसता आम्हांकडून कोणीह शरणागति लिहवून घेतलेली नाही. स्वतंत्र भारताच्या लोकप्रतिनिधींनी स्वतंत्रपणे, स्वेच्छापूर्वक नि एकमुखाने आमच्या राज्यघटना परिषदेत ही घोषणा केलेली आहे. अर्थात्‌ही निरुपायाची शरणागति नसून स्वयंस्फुर्तीची सत्कृति आहे. राष्ट्रकल्याणार्थ, पश्र्चाताप स्पृश्य हिंदूंनी घेतलेले हे स्वयंस्फूर्त प्रायश्र्चित आहे!

    ज्या घटना परिषदेने ही घोषणा केली त्यामध्ये अत्याधिक बहुमत स्पृश्य हिंदूंच्याच प्रतिनिधींचे होते. त्यांनी जर विरोध केला असता तर ही घोषणा सर्वसंमत तर नव्हेच, पण संमतही होऊ शकती. अस्पृश्यतेचा उगम केव्हा झाला. इतिहासाच्या कोणत्या प्राचीन परिस्थितीत जीवन कलहातील एक अपरिहार्य उपाय म्हणून ती स्वीकारली होता. का कोणाचाच नसून त्या वेळच्या परिस्थितीचाच तो एक दुष्ट विपाक होता ह्या प्रश्र्नाची चर्चा येथे अप्रस्तुत असल्यामुळे इतके सांगणे पुरे आहे की, निदान गेल्या नऊ दहा शतकांपासून तरी जन्मजात अस्पृश्यतेची रुढी अन्याय्य असताही, अधर्म्य असताही, राष्ट्रघातक असताही न्याय्य म्हणून, धर्माचरण म्हणून पाळीत राहण्यात चातुर्वणिक स्पृश्यांच्या हातून एक राष्ट्रघातक पाप घडत आलेले होते. ती तीव्र जाणीव त्या राज्यघटना परिषदेत असलेल्या लक्षावधि स्पृश्यांनी निवडून दिलेल्या स्पृश्य प्रतिनिधांना होती. त्या घडलेल्या पापाविषयी त्यांना मन:पूर्वक पश्र्चात्ताप वाटत होता आणि आता यापुढे हे राष्ट्रीय पाप घडू द्यावयाचे नाही असा त्यांचा दृढ संकल्प झाला होता म्हणूनच त्या बहुसंख्याक स्पृश्य प्रतिनिधींनी आपले चिरकालीन विशिष्ट हितसंबंधी वर्णाहंकार नि जात्यहंकार या सर्वांवर राष्ट्रहितार्थ आपण होऊन पाणी सोडून त्या पापाचे स्वेच्छापूर्वक प्रायश्र्चित घेतले आणि एकमुखाने उद्‌घोषिले, की यापुढे या भारतीय राज्यात जन्मजात अस्पृश्यता कोणत्याही स्वरुपात पाळणे हा एक दंडनीय अपराध गणला जाईल!

    घटना परिषदेतील स्पृश्य हिंदूच्या या प्रतिनिधींत चारी वर्णाचे, भिन्न भिन्न उपजातीचे आणि सर्व प्रांताचे प्रतिनिधी होते ही दुसरी गोष्टही ध्यानात धरली पाहिजे. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या अस्पृश्यतेचा अंत करणार्‍या घोषणेच्या प्रश्र्नी तरी या तथाकथित स्पृश्य प्रतिनिधींना प्रबुद्ध, प्रमुख नि प्रतिष्ठित अशा लक्षावधि स्पृश्यजनतेचा भारतव्यापी पाठिंबा होता. याचा अप्रतिविधेय पुरावा हाच की, एखाददुसरा अपवाद सोडता झाडून सार्‍या अखिल भारतीय संघटनांनी नि संस्थांनी या सुधारणेचा कित्येक वर्षापासून सक्रिय पाठपुरावा केलेला आहे आणि या घोषणेला लवलेशही विरोध केलेला नाही. अखिल भारतीय संस्थापैकी लाखो स्पृश्य हिंदु जिचे सभासद आहेत त्या कॉंग्रेसच्या प्रमुख संस्थेने जन्मजात अस्पृश्यतेच्या उच्चाटनासाठी कित्येक वर्षांपूर्वीपासून दृढ प्रतिज्ञा नि अखंड प्रयत्न केलेले आहेत. घटना परिषदेतील प्रतिनिधिमध्ये कॉंग्रेसचेच बहुमत होते हे सांगावयास नकोच. अखिल हिंदुमहासभेच्या तर मूलभूत उद्देशातच अस्पृश्यता निवारणाचा उद्देश प्रमुखपणे गोविलेला आहे. रत्नागिरी हिंदूसभेसारख्या तिच्या उपांगभूत संस्थांनी आणि तिच्या अध्यक्षीय पदावर आरुढलेल्या कित्येक प्रमुख पुढार्‍यांनी केवळ जन्मजात अस्पृश्यतेच्याच नव्हे तर जन्मजात जातिभेदाच्याही उच्चाटनार्थ प्रकट सहभोजनांचे भारतव्यापी आंदोलन केलेले आहे. काही सनातनी संस्थांतून काय तो अस्पृश्यता निवारण्यास प्रतिकूल अशा थोडाफार सूर वाहतो. तेवढा अपवाद सोडल्यास इतर हिंदुत्वनिष्ठ अशा आर्यसमाज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रभुति अखिल भारतीय संस्थांतून अस्पृश्यतेला केव्हाही थारा मिळालेला नाही. प्रागतिक पक्ष, प्रार्थनासमाज, ब्राह्मोसमाज इत्यादी जुन्या संस्थाही अस्पृश्यतेचा नायनाट करण्यास सर्वतोपरी अनुकूल होत्या. मुख्यत: आर्थिक प्रश्र्नांनाच सोडविण्यात सध्या व्यग्र असणार्‍या सोशालिस्ट नि कम्युनिस्ट पक्षांच्या अखिल भारतीय संघटनांत जे सहस्त्रावधि स्पृश्य हिंदु आहेत तेही त्या पक्षांच्या विशिष्ट तत्वज्ञानानुसारच जन्मजात अस्पृश्यतेच्या उच्चाटनाच्या कार्यी रेसभरही मागे रेंगाळणारे नाहीत. हेही ध्यानात ठेवले पाहिजे की, ह्या आजच्या घोषणेच्या वीस पंचवीस वर्षापूर्वीपासून कित्येक लहान मोठ्या हिंदु संस्थानिकांनी त्यांच्या त्यांच्या हिंदुराज्यांतून जन्मजात अस्पृश्यता नष्ट करणार्‍या अशाच नैर्बंधिक घोषणा त्यांच्या स्पृश्य हिंदुच बहुसंख्याक असलेल्या विधिमंडळाच्या संमतीने केलेल्या होत्या आणि व्यवहारिल्याही होत्या. या सर्व गोष्टींवरून हे उघड होत आहे की, स्पृश्य हिंदूच्या प्रचंड संख्येतील विचारशील, मुखर, कर्ता नि महत्वाचा जो भाग आहे त्याचा या घोषणेला भारतव्यापी पाठिंबा आधीपासूनच होता. किंबहुना लक्षावधि स्पृश्य हिंदूच्या मनात जर ही विचारक्रांती आधीपासूनच झालेली नसती आणि अस्पृश्यतेचा नायनाट करावयाचा कृतसंकल्प त्यांनी केलेला नसता, तर ही घोषणा करणे मुळातच दुर्घट झाले असते. आणि जर स्पृश्यांच्या मताला न जुमानता एवढा भूकंपीय पालट हिंदूसमाजरचनेत करण्याचे धाडस कोणी केले असते, तर तशा धाडसाची जी गत अमेरिकेत झाली तीच इकडे झाल्याविना बहुधा राहती ना.