प्रस्तावना
श्री. विनायक सावरकर यांचे चरित्र त्यांच्या हयातीत लिहिले जाईल असे मला वाटले नव्हते. परंतु ते लिहून आज छापलेही जात आहे, इतकेच नव्हे तर त्याची प्रस्तावना लिहिण्याविषयची मला विनंती करण्यात येत आहे हे मी आश्र्चर्यातले आश्र्चर्य मानतो. चरित्रकारांनी देऊ केलेला हा मान नाकारणे हे मला जड का वाटले, व दुसरेपक्षी प्रस्तावना लिहिणे हेहि जड का वाटते, याची कारणे मी सांगत बसत नाही. सावरकरांची व माझी काही काही मते न जुळण्यासारखी त्यांची व माझी मनोरचना आहे, हे मला माहित आहे. पण ती जुळतात वा न जुळतात हे संभाषणांत पडताळून पाहण्यासारखा त्यांचा माझा प्रत्यक्ष संबंध ते तुरुंगातून सुटण्यापूर्वी कधीच आला नव्हता. माझी आठवण बरोबर असेल तर मला असे वाटते की, 1907 साली सार्वजनिक सभेत भरलेल्या ज्या एका जाहीर सभेचा मी अध्यक्ष होतो त्या सभेत सावरकर हे एक वक्ते होते; व सभेतून परत जाताना त्यांच्या तेजस्वी वक्तृत्वाची वाखाणणी मी मनात करीत असता, परदेशी कपड्यांची होळी करण्यासारख्या कृत्याविरुद्ध मी बोललो याबद्दल ते मला मनातून नावे ठेवीत परत जात असावे. सावरकर व मी यांचे प्रत्यक्ष भाषण असे सर्व जन्मांत ते परवा तुरुंगातून सुटून रत्नागिरीस जात असता मुद्दाम मला भेटण्याकिरता माझे घरी आले त्यावेळीच प्रथम झाले; व हे सावरकर असे त्यांना मी आजपर्यंत प्रत्यक्ष दुसऱ्यांदा याच वेळी पाहिले !
पण सावरकरांशी माझे पूर्वी प्रत्यक्ष भेटणे बोलणे झाले नसले तरी त्यांची कीर्ति मी ऐकलीच होती; व त्यांची माझी मते जुळणारी नसली तरी त्यांच्या धाडसी बाणेदार स्वभावाचे कौतुक करणारांपैकीच मीही एक होतो. त्यांच्या देशभक्तीचा थाट आयरिश देशभक्तांच्या देशभक्तीसारखा होता. स्वत: मी आयर्लंडचा इतिहास लिहिलेला आहे व दूरच्या आयरिश देशभक्तांचे जर आम्ही कौतुक करितो तर जवळच्या व आपल्याच समाजात उत्पन्न झालेल्या अशा देशभक्ताचे कौतुक आम्ही न करणे हा गुन्हा होय असे मी पूर्वी मानीत होतो व आजहि मानतो. कै. गोखले यांना सावरकरांचा बिनसनदशीरपणाचा जुना मार्ग शंभर टक्के नापसंत होता हे सांगावगायास नकोच. परंतु सावरकरांच्या इतर गुणांबद्दल गोखले यांनीही स्वत: मजजवळ अनेक वेळा प्रशंसापर उद्गार काढल्याचे मला पक्के स्मरते. असो; आमचा स्वभावभेद कायमचा असला, व त्यामुळे साधनाविषयी त्यांचा व माझा पूर्वी मतभेद असला तरी आता तो उरलेला नाही. आणि पूर्वीचे त्यांच्या विषयीचे माझे कौतुक मात्र तसेच शिल्लक आहे. म्हणूनच ही प्रस्तावना लिहिण्याचे मी कबूल केले.
श्री. सावरकर यांच्या पूर्व चरित्रावर त्यांनीच आपल्या अलीकडील जाणत्या उद्गारांनी पडदा टाकला असल्यामुळे, या पूर्व चरित्रास आता पदार्थसंग्रहालयांतील काचेच्या कपाटांतील वस्तूंचे स्वरूप प्राप्त झाले आहे. प्रत्यक्ष व वर्तमान यांच्याशी संबंध न येणाऱ्या हकीकतींकडे कोणीही निर्विकार मनाने पाहू व बोलू शकतो. पण ही मन:स्थिति अशी केवळ इतरांचीच असते असे नाही तर स्वत: ज्याची त्याचीही असू शकते. मोठ्या मनुष्याला त्याच्या लहानपणच्या खोडकर स्थितीतला एखादा फोटो दाखविला तर त्याविषयीं त्याची जी भावना होइल तीच सावरकर यांची त्यांच्या पूर्व-चरित्रासंबंधाने आज असेल. समकालीन तरुण पिढीला त्यांचा देशभक्तिभरित खोडकरपणा सर्वस्वी अनुकरणीय नसला तरी स्पृहणीय वाटला खास !
पर्वताच्या माथ्यावर अशा जागा असतात की त्यांवर पडलेले पावसाचे पाणी जर पूर्व समुद्राला जाऊन मिळते, तर जवळच एका बोटाच्या अंतरावर पडलेले पाणी पश्र्चिम समुद्राला जाऊन मिळते. मनुष्याच्या उन्नत भावनांचाही असाच प्रकार असतो. देशभक्तीची उत्कटता तीच असतां स्वभावभेदामुळे काही देशभक्त सद्य:परिणामी क्रांतिकारक मार्गाला लागतात तर दुसरे सनदशीरपणाचा कंटाळवाणा मार्ग जोखाळीत जन्मभर अंत:करण पिचवीत असतात. अर्थात् दोघांचीही निष्ठा एकच पण मार्ग मात्र वेगवेगळे असल्याकारणाने त्यात अनुभवही वेगळे येतात, व प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारच्या कीर्तिचे फळ मिळते. पण त्यातल्यात्यात सावरकरांना मात्र दोन्ही मार्गांचा अनुभव व दोनही प्रकारची फळे लाभण्याचा संभव दिसतो. पहिला म्हणजे क्रांतिकारक मार्ग त्यांचा चोखाळून संपला व हिंदुस्थानला स्वराज्याची घटना मिळाल्यामुळे यापुढे बंडाला अवसर उरत नाही हे उद्गार त्यांनी काढल्यापासून त्याच्या दुसऱ्या मार्गाचे आक्रमण सुरू झाले. त्यांच्या एका जवळच्या मित्राने मला नुकतेच असे निक्षून सांगितले की, प्रतियोगी सहकारितेच्या धोरणावर सावरकरांचा पूर्ण विश्र्वास आहे आणि दैवालाही घटना करणेच असेल तर तुरुंगवासामुळे त्यांना जडलेली अपात्रता (Disqualification) धुवून निघून, मागेपुढे प्रांतिक कौन्सिलांत शिरून, मुंबई इलाख्याला प्रांतिक स्वातंत्र्य मिळाल्यावर, ते प्रधानही होतील ! विलायतेतली उदाहरणे घेतली असता लॅंडलीगच्या चळवळीत तुरुंगवास भोगलेले आयरिश देशभक्त टिमथी हेली हे नव्या आयरिश स्वराज्यांत गव्हर्नर झाले. मजूर पक्षाच्या पहिल्या चळवळींत कैद भोगलेले व खडी फोडलेले जॉन बर्नस हे इंग्लंडच्या प्रधानमंडळात प्रधानपद पावले आणि एकोणिसाव्या शतकाच्या मध्यभागी बंडखोरीच्या चळवळींत फाशीची शिक्षा दिली गेलेल सर चार्लस गॅव्हन डफी हे ऑस्ट्रेलियांत मुख्य प्रधान झाले. 'पुरुषस्य भाग्यं' ही म्हण प्रसिद्धच आहे. गॅरिबाल्डीला फाशीची शिक्षा झाली असता कालांतराने सिसिली बेट जिंकून राजास अर्पण करण्याचा मान त्याला मिळाला; आणि जो गॅरीबाल्डी पूर्वी फांसावर चढावयाचा तो पुढे इटलीचा उद्धारकर्ता म्हणून स्वराज्यविषयक मिरवणुकीत एकाच गाडीत राजाच्या डाव्या हातास बसून मिरवतो हे पाहणाराला काय वाटले असेल ? विलियम ओब्रायन या आयरिश पुढाऱ्यानेही अशा स्थित्यंतराला अनुलक्षुन आपल्या 'आयरिश आयडियाज' या पुस्तकात खालील अनुभव लिहिला आहे.
The ingenuity which had formerly to be employed to shake off the nightmare in the dark grey coats and rifles has now only to be applied to the more innocent, if more difficult, task of evading ''the little addresses'' and the ''few words'' whith which popular hospitality will insist upon enlivening the road.
उलटे सुलटे खेळ करणे ही दैवाची लीला सुप्रसिद्धच आहे. दादाभाई नौरोजी यांनी वयाच्या ऐंशीव्या वर्षी 'मी तरुण असतो तर बंड केले असते' असे उद्गार कलकत्यास काढले. विनायकराव सावरकरांना बंडखोरीचा अनुभव घेऊन प्रतियोगी सहकारितेचे गौरवर करण्याचा प्रसंग पसतिशीच्या सुमारास आला.
तथापि अद्भुतरम्यत्वाच्या दृष्टीने पाहाता सावरकर हे उद्या प्रधान झाले तरी त्यापेक्षा त्यांनी विलायतेहून परत येताना जो पराक्रम केला तोच भावी तरुण पिढीच्या दृष्टीने अधिक सरस ठरेल यात शंका नाही. प्रधान पुष्कळ होतात; पण जिवावर उदार होऊन पराक्रम करण्याचा प्रसंग थोड्यांना येतो; व आला तरी तो साधणारे त्याहूनही थोडे असतात. युद्धानंतर लीग ऑफ नेशनसच्या दरबारात हिंदुस्थानला आम्ही जागा दिली अशी बढाई सरकार मारते. पण जहाजाच्या पोर्ट होलमधून समुद्रात उडी टाकून फ्रान्सच्या भूमीवर पाय ठेवून, इंटरन्याशनेल लॉची तक्रार सांगून, "बोला हो बोला हो बोला हो सर्व सभ्य बोला हो'' असा सवाल जगातील सर्व राष्ट्रांना करून विनायकराव सावरकरांनीच ते स्थान हिंदुस्थानला महायुद्धाच्या आधी पाच वर्षे मिळवून दिले होते !
असो ! सावरकर सुटून आले आहेत व त्यांना थोडीशी स्वतंत्रताही लाभली आहे. परंतु त्यांच्या अज्ञातवासाची अजून चार साडेचार वर्षे जावयाची आहेत. तेव्हा हेही दिवस लवकर निघून जावोत व तुरुंगवासात घालविली तितकी वर्षे तरी त्यांना या नव्या मार्गाने देशाची सेवा करण्याला मिळो अशी इच्छा प्रदर्शित करून मी प्रस्तावना पुरी करतो.
मुंबई ता. 6 आगष्ट
1924
- Login to post comments